१५. भारतीय संस्कृती : अंतरंग दर्शन -२
-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------
१५. भारतीय संस्कृती : अंतरंग दर्शन -२
साने गुरुजींच्या मनीमानसी भारतीय संस्कृतीची अपूर्त अशी मूर्तीस्थापना कशा प्रकारची झालेली होती व ज्या मांगल्याचा ध्यास त्यांनी आपल्या हृदयाशी आयुष्यभर जतन केला होता, तोही कशा प्रकराचा होता, हे त्यांच्या शब्दाशब्दांतून सहज सुंदर, सुलभपणे प्रकट झालेले आहे. या पुस्तकात गुरुजींनी अद्वैत बुद्धी, वर्ण, कर्म, भक्ती, ज्ञान, संयम आदी
विषयांवर सुबोध सुंदर निबंध लिहिलेले आहोत. समाजपुरुषाची कर्ममय पूजा करणारे सर्व श्रमजीवी लोक भारतीय क्रषींना कसे वंदनीय वाटत होते, हे गुरुजींनी रुद्रसूक्तातील सूक्तांचा दाखला देऊन पटवून दिले आहे -
'चर्मकारेभ्यो नमो, रथकारेभ्यो नमो, कुलालेभ्यो नमो'
अरे चांभारा, तुला नमस्कार, अरे सुतारा तुला नमस्कार, अरे कुंभारा तुला नमस्कार. हे सारे श्रमजीवी त्या थोर ऋषीला वंद्य वाटत आहेत. तो चांभाराला अस्पृश्य मानीत नाही, कुंभाराला तुच्छ लेखीत नाही. समाजाला जिवंत विचार देणाऱ्या विचार-द्रष्ट्यांइतकीच मडकी देणाऱ्यांचीही तो योग्यता मानीत आहे.
"There is nothing great or smallin the eyes of God."
कर्ममय भक्तीचा महिमा वर्णन करताना गुरुजी सहज लिहून जातात-
एक हात भू नांगरणे
शत व्याख्यानाहून थोर
एक हात खादी विणणे
मंत्र जपाहुन ते थोर
एक वस्त्र वा रंगविणे
तव पांडित्याहुन थोर
शेतकरी, तसे विणकारी, तसे रंगारी बना देशाचे
आळशी न कुणी कामाचे, यापुढे
एक नीट मडके करणे
तव व्याख्यानाहुन थोर
एक नीट जोडा शिवणे
तव श्रीमंतीहुन थोर
चाकास धाव बसविणे
तव विद्वत्तेहुन थोर
कुंभार, तसे चांभार, तसे लोहार बना देशाचे
आळशी न कुणी कामाचे, यापुढे ॥
गुरुजींनी घडवलेले भारतीय संस्कृतीचे दर्शन असे दिव्य, भव्य आणि कर्ममय आहे. याच सुमारास गुरुजींनी आणखी एक मोठे वाड्मयीन कार्य पार पाडले आणि ते म्हणजे मराठी लोकसाहित्यातील स्त्रीधनाची जपणूक. 'जात्यावर बसले की ओवी सुचते' अशी म्हणच रूढ झाली आहे. कितीतरी मायबहिणींनी दळताना, कांडताना अगणित ओव्या रचलेल्या आहेत. त्यात भावा-बहिणींच्या, लेकी-सुनांच्या, माय-लेकरांच्या, सुख-दु:खाच्या, लग्नकार्याच्या, शेत-मळ्याच्या, गाई-गुरांच्या सणावाराच्या
कितीतरी विषयांवरच्या ओव्या आहेत. अक्षरांशी ज्यांना ओळखही नाही आणि काव्यशास्त्र ज्यांना ठाऊकही नाही, अशा खेड्यापाड्यांतील ग्रामीण भगिनींनी आपल्या अनुभवातून, जीवनातून हे अस्सल, जिवंत वाडूमय निर्मिलेले आहे.
गुरुजी म्हणतात, “ज्या वाडमयात स्रियांनी आपला आत्मा संपूर्णपणे ओतला आहे, असे वाड्मय म्हणजे ओवी वाडूमय. या ओव्या सहजस्फूर्तीने रचल्या गेल्या आहेत. त्यातील अकृत्रिम सहृदयता अपूर्व आहे. या ओव्यात वत्सलतेचा सिंधू आहे. कोठे कोठे विनोदांची सुंदर छटाही आहे. इतरही रस आहेत.” रामची आई, आक्का, मावशी आणि इतरही स्त्रियांकडून गुरुजींनी या ओव्या टिपून घेतल्या. त्या निवडल्या, पाखडल्या, त्यांचे वर्गीकरण केले आणि सुंदर रसग्रहणासोबत 'स्त्री-जीवन' या नावाने त्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध केल्या.
लोकसाहित्याची जमवाजमव आणि निवड करून ते प्रसिद्ध करणे, हे फार मोलाचे काम गुरुजींनी केले आहे.
गुरुजींना अशा प्रकारे ओव्या जमविण्याचा छंद आहे म्हणून पालघड या त्यांच्या जन्मगावी जेव्हा त्यांनी गीताप्रवचने दिली, तेव्हा समारोपाच्या वेळी गावातल्या एका आजीबाईंनी तिथेच एक ओवी रचून, गुरुजींचे नाव गोवून म्हटली-
पालगडच्या गणपतीला ।
बेदाण्याचा आवडे शिरा ।
काँग्रेसमध्ये शोभे हिरा ।
पंढरीनाथ ॥
-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------