कॅशफ्लो क्वाड्रंट ( उत्पन्नाचे मार्ग)

कियोसाकीच्या दृष्टीने माणसापुढे नोकरी, व्यवसाय, उद्योग व गुंतवणूक असे चार प्रकारचे उत्पन्नाचे मार्ग उपलब्ध असतात. किंबहुना पैसे मिळविणार्या लोकांचे नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक आणि भांडवलदार या चार विभागात आपण वर्गीकरण करू शकतो.
या चार विभागांना आलेखातील चार उपविभाग समजून कॅशफ्लो क्वाड्रंटची आकृती कियोसाकीने खालील प्रमाणे मांडली आहे.
यातील डावीकडील नोकरदार व व्यावसायिक या विभागात आपणास कंपनीसाठी किंवा स्वतःसाठी काम करावे लागते तेव्हा पैसे मिळतात. उजवीकडील वरच्या उद्योजक विभागात आपण असाल तर उद्योगच आपल्यासाठी पैसे मिळवून देतो व उजवीकडील खालच्या भांडवलदार वा गुंतवणुकदार विभागात आपण असाल तर आ्पण गुंतविलेल्या पैसेच उत्पन्नाचे साधन असते. म्हणजे उजवीकडील दोन्ही विभागात आपण स्वतः मेहनत न करता पैसे मिळवू शकतो.
मात्र या चारही विभागात पैसे मिळण्यासाठी घ्यावी लागणारी जोखीमही वेगवेगळी असते. नोकरी करताना आपले उत्पन्न मर्यादित व मालकावर अवलंबून असते. डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट, इंजिनीअर, सल्लागार असा व्यवसाय करणार्यांच्या उत्पन्नाची मर्यादा त्यांच्या स्वतःच्या कष्टांवर अवलंबून असते. उद्योगातून मिळणारा पैसा उद्योगात असणारे भांडवल, यंत्रसामुग्री, कर्मचारी वर्ग व व्यवस्थापकाचे कौशल्य यावर अवलंबून असतो. मात्र यात नुकसान होण्याचीही शक्यता असते. भांडवल गुंतवणूकीतून मिळणारा पैसा सर्वात कमी कष्टात मिळतो. परंतु आपण गुंतविलेला पैसाही कमी होण्याचा धोका असतो.
या चारही विभागात माणूस श्रीमंत वा गरीब होऊ शकतो हे लक्षात घेतले पाहिजे. तरीही सर्वसाधारणपणे श्रीमंत व्यक्तींचा जीवनप्रवास नोकरीतून व्यवसाय, व्यवसायातून उद्योग, आणि उद्योगातून गुंतवणुकीकडे अशा मार्गाने होताना आढळतो. अर्थात भोवतालच्या परिस्थितीनुसार कोणत्याही एका विभागातून दुसर्या विभागात जाऊन यश साधणे शक्य असते. मात्र त्यासाठी फायदा तोटा पत्रक आणि ताळेबंद यांचे योग्य ज्ञान असणे आवश्यक असते.
असेट वाढल्यास उत्पन्नात वाढ होते व लाएबिलिटी वाढल्यास खर्च वाढतो ही गोष्ट बर्याव्च लोकांच्या ध्यानात येत नाही व त्यामुळे त्यांना पैसे मिळण्याचे मार्ग न निर्माण होता कर्जफेडीचा भार सोसावा लागतो व त्यांची आर्थिक स्थिती खालावत जाते.