९. शिक्षणातील प्रयोग - ११

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील Written by सौ. शुभांगी रानडे

९. शिक्षणातील प्रयोग - ११

३४) भाऊरावांना तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालये सुरू करण्याची इच्छा होती. त्यासाठी पहिळे कराड हे गाव निवडले. सन १९५३ साली विजयादशमीच्या दिवशी कराडला संत गाडगे महाराज यांचे नावे जून १९५४ पासून महाविद्यालय सुरू करण्याचे जाहीर केले. तालुक्याचे गाव असले तरी पंचक्रोशीत या महाविद्यालयात पुरेशी मुले येतील अशा अनेक माध्यमिक शाळा होत्या. कलिजच्या जागेचा प्रश्‍न कराडच्या पूर्वेस एका बंद पडलेल्या कारखान्याच्या इमारती मिळवून सुटला. पुणे विद्यापीठाने परवानगी दिली. पुण्याच्या मंडईतील भाजीविक्रेत्याकडून श्री. बाबूराव सणस व मेयर शंकरराव उरसळ यांनी एका दिवसाची कमाई देणगीसपाने मिळवून पुणे विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे भरावी लागणारी रक्कम उभी
केली व हे महाविद्यालय सुरू झाले.

३५) भाऊरावांच्या हयातीत सुरू झालेले तिसरे महाविद्यालय म्हणजे सातारचे आझाद शिक्षण महाविद्यालय. सन १९५४ सालापर्यंत र. शि. संस्थेच्या ५५ माध्यमिक शाळा होत्या. यापैकी अनेक शाळांवर शिक्षण खात्याच्या नियमानुसार बी. टी. किंवा बी. एड. मुख्याध्यापकच नेमावे लागत. बेळगाव, कोल्हापूर, मुंबई येथील शासकीय बी. एड. महाविद्यालहयात मोजक्याच पदवीधरांना प्रवेश मिळत असे. म्हणून जून १९५५ पासून सातार्‍यात बी. एड. महाविद्यालय सुरू करण्यासाठी पुणे विद्यापीठाकडे अर्ज करण्यात आला होता. कराडला गाडगे महाराज महाविद्यालय सुरू केल्याने आर्थिक अडचण होती तरीदेखील धाडस करून हे महाविद्यालय सुरू करण्यात आले. मुंबईचे श्री शेठ त्रिकमदास ठाकुरदास यांनी डॉ. आर. के. भोसले यांचेमार्फत रु. ५,००० पाठविले. त्याशिवाय संस्थेच्या प्रवरानगर शाखेतर्फे मी काही रक्‍कम दिली व विद्यापीठाच्या नियमानुसार या महाविद्यालयासाठी रक्‍कम उभी करण्यात आली. संस्थेतर्फे निघतील तेवढी माध्यमिक विद्यालये सुरू करण्यास वेग आला. या सालापासून बी. एड. कॉलेजमध्ये शेकडा ७५ विद्यार्थी-शिक्षक संस्थेच्या शाळेतीलच असत. संस्थेच्या महाविद्यालयातून तयार झालेले टी. डी. शिक्षक व हे बी. एड. शिक्षक उपलब्ध झाल्याने रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळांत विनीत शिक्षकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले व त्याबरोबरच गुणवत्तेच्या प्रमाणात मोठा व लक्षणीय फरक पडला. बी. एड. कॉलेजचे पुढे आझाद शिक्षण महाविद्यालय नामकरण करण्यात आले.

३६) भाऊरावांचा आजार सन १९५५ पासून फारच बळावला. त्यांचे हृदय प्रमाणाबाहेर विस्तारले होते. संधी वाताने त्यांचे पाय सुजलेले असत. प्रवास व फिरणे जवळ जवळ थांबले होते. उपचारासाठी वाई, पुणे आदी ठिकाणी त्यांना हलवावे लागे. त्यांचे मन नवनवीन योजना आखण्यात गढले असावयाचे; पण दुर्बल शरीर साथ देत नव्हते. स्वत: होऊन धडपडून अस्तित्वात आणलेले बी. एड्‌. कॉलेज ही शेवटची शाखा होय. त्यातूनहि स्वीय सहाय्यकाची मदत घेऊन महत्त्वाच्या समारंभास ते हजर राहात. यापुढे संस्थेच्या दृष्टीने त्यांचे अस्तित्व मोलाचे होते. आजीव सेवक व त्यांचे स्नेही त्यांना प्रवास व शारीरिक भ्रम टाळून विआंती घेण्यास सुचवीत. पण विश्रांती हा त्यांचा स्वभावधर्म नव्हता. त्यांचा आजारच त्यांना सक्तीने विश्रांती घ्यावयास लावीत होता; आणि त्यानेच शेवटी त्यांना ९ मे १९५ ९ रोजी चिरनिद्रा घ्यावयास लावली.

Hits: 64
X

Right Click

No right click