४. उपजीविकेच्या शोधात -४

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील Written by सौ. शुभांगी रानडे

११) भाऊरावांना सुरुवातीस एका अतिशय सामान्य मगदुराच्या मुलाची शिकवणी मिळाली. भाऊराव त्यास 'मठ्ठ' मुलगा म्हणत. इतर काम किंवा शिकवण्या नसल्याने या मुलावर दोन तासांपेक्षा अधिक वेळ ते खर्च करीत. याचा परिणाम असा झाला की, 'पाटील मास्तर' अतिशय चांगले शिकवितात असा आजुबाजुच्या आळीतील घरांत या मुलाच्या पालकांकडून प्रचार झाला. त्यामुळे अधिक मुले शिकवणीस मिळू लागली.
घरी तयारी करण्यामुळे भाऊरावांचे प्राथमिक शाळेतील विषयांचे ज्ञानही सुधारत गेले. यातून सुमारे रु. २०/- दरमहा मिळू लागले. दुसरी शिकवणी मिळाली ती श्री. पोप नावाच्या इंग्रज उपजिल्हाधिकाऱ्यास मराठी _ शिकविण्याची. तिसरी शिकवणी मिळाली ती पेठे नावाच्या अधिकार्‍याच्या मुलास संस्कृत शिकविण्याची. येथे मात्र भाऊरावांची कसोटी होती.


भाऊरावांस संस्कृतचा अभ्यास कोल्ह्पूरच्या जैन पाठशाळेच्या अटीमुळे वसतिगृहात करावा लागत होताच. हायस्कूलमध्ये होताच, पण तो जेमतेम पास होण्यापुरताच. येथेही त्यांचा व्यवहारीपणा उपयोगी आला. सातारला नरसिंहाचार्य गजेंद्रगडकरशास्त्री नावाचे पुरोगामी विचाराचे संस्कृत पंडित होते. त्यांच्याकडे स्वत: संस्कृतचे धडे गिरविण्यास भाऊरावांनी सुरुवात केली. या शिकवणीस फी नसे, मात्र भल्या पहाटे शास्त्रीबुवाकडे अंधारात हातात कंदील घेऊन जावे लागे. पहाटे शिकलेला भागच वरील पेठ्यांच्या मुलास शिकविण्याची पद्धत भाऊरावांनी अवलंबिली. चोथी शिकवणी होती ती सातारच्या महाराजांचे कायदे सल्लागार डोसाभाई माणिकजी यांना मराठी शिकविण्याची. यातून सुमारे ९० रु. दरमहा भाऊरावांना मिळू लागले. मात्र अस्पृश्य मुलांना शिकविण्याची त्यांची कोल्हापुरातील तळमळ इथेही प्रगट झाली. हरिजनवाड्यात जाऊन तेथील हरिजनांची मुळे एकत्र करून त्यांना मोफत शिकविण्याची व त्यांच्यात शिक्षणाविषयी आस्था निर्माण करण्याचा ते प्रयत्न करीत होते. त्यात गणपत मांग नावाच्या गहस्थाचाही मुलगा होता. या गणपतविषयी पुढील प्रकरणात माहिती गणार आहोत. सातारला असताना भाऊराव श्रीमती अंबुबाई मुद्रावळे या विधवा स्त्रीच्या धरी भाड्याने राहात असत. या तरुण विधवा स्त्रीनेही भाऊरावांच्या जीवनासच नव्हे, तर रयत शिक्षण संस्थेच्या वाढीसही मोठा हातभार लावला आहे. तोही पुढील प्रकरणात सांगण्यात येईल.

१२) भाऊरावांची उपजीविकेच्या दृष्टीने प्राप्ती बरी होत असल्याने, कोरेगावला येऊन जाऊन ते राहत असत. जून महिन्यात कोरेगावला असताना त्यांना कोल्हापुरहून श्री. कल्याप्पा निटवे नावाच्या गृहस्थांची ९-६-१९१४ तारीख असलेली तार आली. तारेत फक्त 'कोल्हापूरला तात्काळ निघून यावे' एवढाच मजकूर होता. भाऊरावांना कोल्हापूरची ओढ होतीच. आपल्यापुढे कोणते संकट वाढून ठेवले आहे, त्याचा विचार न करताच भाऊराव त्याच रात्री कोरेगावहून निघून दुसर्‍या दिवशी कोल्हापुरास औ. निटव्यांच्या जिनेंद्र प्रेसच्या इमारतीत हजर झाले.

Hits: 91
X

Right Click

No right click