शंकर पाटील
मराठीतील ग्रामीण कथालेखक म्हणून शंकर पाटील आपणास परिचित आहेत. त्यांचे पूर्ण नाव शंकर बाबाजी पाटील होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील पट्ट्णकोडोली या गावी इ.स.१९२६ मध्ये झाला. शंकर पाटील यांचे शिक्षण तारदाळ, गडहिंग्लज व कोल्हापूर या गावी झाले. त्यांनी बी.ए.बी.टी पर्यत शिक्षण घेतले. १९५७ मध्ये त्यांची आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर नियुक्ती झाली.‘वळीव’हा त्यांचा पहिला कथासंग्रह इ.स.१९५८ मध्ये प्रसिद्ध झाला.
प्रयोगशीलता हे शंकर पाटलांच्या लेखनाचे एक महत्वाचे वैशिष्टय मानले जाई. ग्रामीण समाजाचे हुबेहुब चित्रण मोठ्या बहारीने आणि काहीशा विनोदी ढंगाने करण्यात पाटलांचा हातखंडा होता. ग्रामीण जीवनाचा आणि तेथील माणसांचा अचूक वेध घेण्याची क्षमता त्यांच्या लेखणीत होती. शंकर पाटलांनी वगनाटये, चित्रपटकथा, कांदबरी इत्यादीप्रकारचे लिखांण केले. त्यांनी गल्ली ते दिल्ली, कथा अकलेच्या कांद्याची, लवंगी मिरची कोल्हापुरची ही वगनाटये लिहिली. त्यांच्या कथा व संवाद असलेले काही महत्वाचे चित्रपट - एक गाव बारा भानगडी, केला इशारा जाता जाता, पिंजरा, डोंगराची मैना, गणगौळण, पाहुणी, चोरीचा मामला इत्यादी.
शंकर पाटील त्यांच्या काही कथासंग्रहांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कारही लाभले. इ.स. १९८५ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची निवड झाली होती.
ग्रंथसंपदा : वळीव, भेटीगाठी, आभाळ ,धिंड, ऊन, वावरी शेंग, खुळ्याची चावडी, पाहुणी, फ़क्कड गोष्टी, खेळखंडोबा, ताजमहालमध्ये सरपंच इत्यादी कथासंग्रह. टारफ़ुला ही कांदबरी.