ज्योतिर्लिंग

Parent Category: महाराष्ट्र दर्शन Category: मंदिरे Written by सौ. शुभांगी रानडे
 

१. त्र्यंबकेश्वर :-

       नाशिकपासून अवघ्या ३६ कि.मी. अंतरावर ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी हे स्थान आहे. दक्षिणेतील गंगा म्हणून ज्या नदीचा उल्लेख केला जातो ती गोदावरी नदी येथेच उगम पावते.
      पुराणातील एका आख्यायिकेनुसार गौतम ऋषी यांनी येथील ब्रम्हगिरीवर शंकराची तपश्चर्या करून त्यास प्रसन्न केले होते. प्रसन्न झालेल्या शंकराने गौतम ऋषींच्या इच्छेनुसार गौतमी (गंगा) आणि गोदावरी या नद्यांना स्वर्गातून भूमीवर आणले. गोदावरीचा ओघ गौतम ऋषींनी कुशावर्तावर थोपविला म्हणून कुशावर्त कुंड हे यात्रेकरू भक्तांचं तीर्थस्थान झालं आहे. येथील गोदावरी जळात प्रथम तीर्थस्नान करूनच यात्रेकरू त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करतात. त्र्यंबकेश्वर मंदिर हे शंकराचं मंदिर असून दर सोमवारी येथे त्र्यंबकेश्वराची पालखी मिरवली जाते. शिवरात्रीच्या दिवशी येथे यात्रेकरू फार मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.

    दर बारा वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. कुंभमेळा हा सर्वात पवित्र उत्सव मानला जातो व त्यावेळी संपूर्ण देशभरातील साधू, सन्यासी, संत-सत्पुरूष सामान्य भक्त लाखोंच्या संख्येने त्र्यंबकेश्वर येथे येतात.
त्र्यंबकेश्वराचे मंदिर उत्कृष्ट स्थापत्य व शिल्पकलेचा सुंदर नमुना होय. मंदिराच्या सभोवतालच्या परिसरात नीलपर्वत, अंजनेरी, निवृत्तीनाथांची समाधी, गंगाद्वार आदि अनेक पवित्र स्थाने आहेत.

२. भीमाशंकर
    
   पुणे जिल्ह्यात पुणे शहरापासून सुमारे १०० कि.मी. अंतरावर हे ज्योतिर्लिंग आहे. सह्याद्रीच्या कुशीत जवळपास १०३५ मीटर उंचीवर हे स्थान आहे. भीमा नदीचे हे उगमस्थान आहे. जेथे ती उगम पावते त्यास मोक्षकुंड म्हणतात. उगमाजवळ भीमाशंकराचे ज्योतिर्लिंग आहे. हे मंदिर प्राचीन असून ते रेखीव दगडांनी बांधलेेले आहे. मंदिरावर नक्षिकामही आहे.
मंदिराच्या बाहेर बांधलेली मोठी घंटा पोर्तुगीज बनावटीची असून ती बहुधा चिमाजी अप्पांनी वसई सर केल्यानंतर हस्तगत केलेली असावी. भीमाशंकराचा परिसर निसर्गसौंदर्यामुळे खूप विलोभनीय दिसतो. थंड हवेचे ठिकाण म्हणूनही भीमाशंकर प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीस तसेच त्रिपुरी पौर्णिमेस याठिकाणी मोठी जत्रा भरते. वन्यप्राणी तसेच वनसंपदा यामुळे हा परिसर संपन्न दिसतो.

३. घृष्णेश्वर

    औरंगाबादपासून नजिक असलेल्या वेरूळच्या लेण्यांपासून अवघ्या एक कि.मी. अंतरावर हे देवस्थान आहे. घृष्णेश्वर हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग असून येथील मंदिर १८व्या शतकात बांधलेले आहे. देवळाचे स्थापत्य तसेच त्यावरील कोरीव काम अतिशय देखणं आहे. या मंदिराच्याजवळच होळकर मंदिरही आहे.

४. औंढा नागनाथ

देशातील १२ ज्योतिर्लिंगात येथील मंदिर हे आद्य ज्योतिर्लिंग समजले जाते. याठिकाणी एक नागनाथ नावाचे प्राचीन मंदिर असून स्थापत्य आणि शिल्पकला अतिशय देखणी आहे. बांधणी हेमाडपंथी शैलीची आहे. हे मंदिर पांडवांनी बांधले, असा समज आहे. ते द्वादशकोनी आहे. संत नामदेव कीर्तन करीत असताना हे देवालय फिरले अशी आख्यायिका आहे. संत नामदेव यांचे घराणे औंढा नागनाथ पासून जवळच असलेल्या नरसी-बामणी या गावचे. तसेच नामदेवांचे गुरू संत विसोबा खेचरे हेही मूळ नागनाथ येथील होते. संत नामदेवांना याच देवळात गुरूकृपा झाली.

५. परळी वैजनाथ

    हे ज्योतिर्लिंग बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे द.म. रेल्वेवरील एक स्टेशनही आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. येथील मंदिर प्रशस्त असून ते जागृत देवस्थान आहे. मंदिर लहानशा टेकडीवर असून ते चिरेबंदी आहे. मंदिराला लांबच लांब भरपूर पायऱ्या आहेत. मंदिराचे प्रवेशद्वार अतिशय भव्य आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जिणोद्धार केला आहे. मंदिराच्या सभोवताली तीन कुंड आहेत.

Hits: 298
X

Right Click

No right click